तुळशीपत्र
** निर्वाण **
सगळे संपल होत. बंधूंचा निष्प्राण देह शांतपणे पहुडला होता. चेहराही शांत झाला होता. मला दिलेला शब्द पाळल्याचे समाधान दुधावरच्या सायीसारखे चेहऱ्यावर पसरले होते. अगदी शेवटच्या क्षणीही त्यांनी आपला शब्द पाळला होता. त्यांचा लाडका पंचम आल्यानंतरच त्यांनी हे जग सोडले होते. आपल्या थरथरत्या हातात माझा हात घेऊन, बंधू कुजबुजले की बिलकुल रडायचे नाही. बंधूंना आवडणार नाही. सिनेमात असे बरेच मृत्यू मी बघितले होते. आज मात्र तो प्रत्येक्ष अनुभव बंधूंनी दिला. डोळ्यांतून अश्रूही आले नाहीत. डोळे त्यांचेच गुलाम झाले होते. शब्द दोघांनीही पाळले होते. त्यांनी आणि मी सुद्धा. स्वामींचे चरणामृत आणि अंगारा बाजूलाच होता. प्रथमच मी त्यांना अंगारा लावला आणि चरणामृताचा एक थेंब निर्जीव ओठांना लावला. बाहेर आलो आणि बघितलं तर बंधूंचा लाडका टायगर माझ्या जवळ आला, आणि माझे पाय चाटू लागला. बंधू या जगात नाहीत हे जणू त्यालाही कळले होते . आणि तो मुका प्राणी त्या वेदनेची ठसठस डोळ्यांतून दाखवत होता. जा...त्रास न देता बसून राहा, म्हटल्यावर जड पाय टाकत टायगर आत गेला. आपल्या जिभेने त्याने बंधूंचे पाय चाटले आणि त्यांच्या पायांकडे चुपचाप बसून राहिला. माझ्याप्रमाणे त्याच्याही डोळ्यांत पाणी नव्हते . होता एक भकास पणा...शून्याचा वेध घेणारा.मनात दाटून येणाऱ्या दुःखाच्या पुराला आवर घालून मी माधवरावजींना बोलावलं आणि पुढची सारी कामे माधवरावजींनी चोख पार पडली
दरवाजापुढे गाडी उभी राहिली. आणि गाडीतून युवराज व माजी दोघेही उतरले. दोघांनाही अश्रू आवरत नव्हते. माजींचा हात धरून युवराज त्यांना बंधूंच्या जवळ घेऊन गेले. त्यांच्या डोळ्यांतला अश्रूंचा पूर थांबला नव्हता.शांतपणे आपल्या गळ्यातले मंगळसूत्र आणि बांगड्या काठून त्यांनी बंधूंच्या पायाजवळ ठेवल्या. आणि युवराजांच्या छातीवर डोके ठेऊन हुंदक्यात विरघळल्या. युवराज मात्र शांतच होते. बंधूंच्या निर्वाणाने वयापेक्षाही मोठे वाटायला लागले होते. स्वतःला सावरून आपल्या शोकाकुल आईला सावकाशपणे सोफ्यावर बसवून त्यांनी पुढच्या कामाला सुरुवात केली.
.हळूहळू गर्दी जमत होती. माणसांचा लोंढा येत होता. बंधूंच्या विशाल परिवाराची एक जिवंत साक्ष. त्या गर्दीत मी मात्र एकटाच होतो. आईबाबाही आले.आईच्या हाताला धरून सुनंदा मावशीही पाय ओढत आली. आल्याआल्या बंधूंच्या कलेवराला मिठी मारून त्यांच्या कपाळावर तिने आपले वृद्ध आणि शुष्क ओठ टेकले. त्यांचा हात हातात घेऊन भ्रमिष्टपणाने त्या पुटपुटल्या "पुनर्जन्मावर माझा विश्वास आहे आणि तुझ्यावरही". शुध्द हरपून जमिनीवर पडण्याच्या आताच युवराजांनी त्यांना सावरल. आणि माझ्या आईने तिच्या हाताला धरून आत नेल. वासराच्या कलेवराला पाहून गायीने हंबरडा फोडावा तसा एक आर्त हंबरडा सगळ्यांच्या हृदयाचा वेध घेऊ लागला. युवराज घाइघाइने मावशींच्या खोलीत गेले. प्रथमच सुना मावशीच्या ते जवळ गेलेले दिसले. तिचा कृश देह कवेत घेऊन थोपटू लागले. बंधू नसले तरी मावशी आजी आम्ही आहोत ना. सुना मावशीकडे एवढे भावाविव्हळ होताना मी प्रथमच युवराजांना पाहिले. कोणाचे काहीही ऐकायच्या स्थितीत मावशी नव्हती. तिचा लाडका भाचा सोडून गेलेल्या जगाशी तिनेही नाते तोडले. भ्रमिष्ट्पणाच्या गर्तेत आजी हळूच नकळत गेल्या. जाताजाता बंधुंच लाडके गाणे त्यांच्या ओठांवर होत,"एक वार पंखावरूनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात..." मावशींच्या मांडीवर डोक ठेऊन थोपटून घेत हे गान ऐकताना मी बंधूंना कित्येकदा पाहिलं होत. गाणे गाता गाता मावशी कधी झोपी गेल्या ते कळले सुद्धा नाही. आपल्या अंगावरची शाल त्यांच्या अंगावर पांघरून युवराज बाहेर आले. त्या परिस्थितीतही हा फरक माझ्या नजरेतून सुटू शकला नाही.
गर्दीला दूर सारत चैतू धावत धावत आत आला. बंधूंना मिठी मारून रडू लागला. दुःखाचा पूर त्याला आटपत नव्हता. किती भाग्यवान होता तो..! बंधूंच्या वचनाने त्याला अडकवले नव्हते . आपल्या मनाच्या दुःखाला तो वाट देऊ शकत होता. आणि मला मात्र तीही मुभा नव्हती. एखाद्या जखमी जनावरासारख मन आतल्याआत विव्हळत होत. युवराज हळूच चैतुच्या जवळ गेले. बंधुंच्या पार्थिवा पासून दूर करून त्यांनी चैतुचे डोळे पुसले. आपल्या कवेत त्याला घेऊन ते म्हणाले बंधूंचे शूर सैनिक आहात तुम्ही. बंधूंना किती वाईट वाटेल तुम्ही असे रडलात तर. युवराज बदलले होते. चैतुच्या बद्दल कधी नव्हेती असुया मला वाटली. त्याची मान टेकायला एक खांदा होता आणि पाठीवर फिरणारे दोन सांत्वनाचे हात. एका कुशीत त्याच्या दुःखाला वाट मिळत होती. अंधाराच्या कवडशा प्रमाणे एक आठवण डोळ्यांसमोरून गेली. आणी एकदा मला त्याचा असाच हेवा वाटला होता. मी आणि चैतू दोघेही आजारी होतो. दोघेही तापाने फणफणत होतो. बंधूंना कळताच ते आम्हाला बघायला आले. आल्याआल्या प्रथमच ते चैतू च्या शेजारी गेले. त्याच्या कपाळावर ठेवलेली कोलोनची घडी त्यांना स्वतः बदलली. त्याच्या कपाळावर हळुवार त्यांनी थोपटताच चैतू झोपी गेला. मग बंधू माझ्या शेजारी आले. माझ्याही कपाळावर ठेवलेला हात मी रागाने दूर केला. बंधूने प्रथम चैतूची विचारपूस केली. हे मी मनोमन सहन करू शकलो नाही. वयाच्ग्या एकविसाव्या वर्षीही लहान मुलांसारखा होऊन मी त्यांचा हात डोक्यावरून दूर सारला. बंधू फक्त माझेच आहेत या भावनेला दिलेला हा पुसटसा ओरखडाही मला सहन झाला नाही. बंधूंच्या डोळ्यांतून पाझरलेले दोन अश्रू कपाळावर पडताच हा राग मावळला. माझ्या हातांन्त तो हात घट्ट धरला. आपले आवडते खेळणे कोणी दुसर्याने नेऊ नये म्हणून जसे लाहणा मुल ते छातीकडे घट्ट धरते . त्यासारखा तो हातही मी घटत धरला होता. कधीही न सोडण्याकरता.
मनाच्या पोकळीत एक वादळ घोंघावत होते . बंधूंचा निष्प्राण देह चितेवर ठेवला, गुरुजींनी सर्व मंत्रविधी आटोपले. युवराजांच्या हातात पेटलेली चूड देऊन चितेला प्रदक्षिणा घालून अग्नी द्यायला सांगितले. युवराज आता मात्र बरेच शोकाकुल वाटले. आतापर्यंत थोपवून धरलेले दुःखाचे लोट डोळ्याचे बंध तोडून वाहत होते. चौथ्या प्रदक्षिणे नंतर युवराज थांबले. पंचम इथे या, म्हणून त्यांनी मला हाक मारली. माझ्या हातात ती पेटती चूड देऊन माझ्या हाताला धरून ते प्रदक्षिणा पूर्ण करत होते. इतक्यात गुरुजी लगबगीने तिथे आले. काय करता युवराज..? मंत्राग्नी मुलानेचे द्यायचा असतो असे धर्मशास्त्र सांगते. अशाने यजमानांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही., आपण त्यांचे पुत्र आहात. परक्यांच्या हातून वडिलांना मंत्राग्नी देणे बरोबर नव्हे आणि धर्म सम्मत हि नाही. शांतपणे युवराजांनी ती चूड माझ्या हाती दिली. आणि माझ्या हाताला धरून त्यांनी ती चितेला लावली. अतिशय शांत स्वरात पण निर्धाराने ते म्हणाले. गुरुजी मी धर्म् शास्त्र जाणत नाही. पण, आयुष्यभर ज्याने माझे लाड पुरवले त्या माझ्या जन्मदात्याची शेवटची अव्यक्त का होईना इच्छा, जर पुरवली नाही, तुमचे शास्त्र मला माहित नाही पण माझा मी स्वतःला क्षमा करू शकणार नाही. भडकणार्या चीतेपासून माझ्या हाताना धरून आणि खांद्यावर हात ठेऊन युवराजांनी मला दूर नेले . आणि त्यांच्या कवेत मी कधी विरघळललो ते मला कळलेही नाही.
अंत्यविधी आटोपून आम्ही निघालो. बंगल्यावर पोहोचलो. बंधूंच्या अनुपस्थितीत ते घर मला खायला उठत होत. हातपाय धुऊन खोलीत गेलो आणि आतापर्यंत रोखून धरलेला अश्रूंचा महापूर वाहू लागला. घरी जावे म्हणून मी युवराजांचा निरोप घ्यायला निघालो. टेबलावर पडलेला पंचा माझ्या हातात देऊन युवराज मला म्हणाले. पंचम आंघोळ करून घ्या. एखाद्या मंत्रचळ्या माणसा
सारखा मी युवराजांचा आदेश पाळला . स्नान करून बाहेर आलो. कपडे घालून बंधूंच्या खोलीत गेलो. खोलीच्या कोपऱ्यात एक अभद्र दिवा तेवत होता. बंधू नसल्याची ग्वाही देणारा. खोलीचे दार उघडून युवराज आत आले. एक कोरडा पंचा त्यांच्या हातात होता. माझ्या हातात देऊन ते मला म्हणाले पंचम डोके पुसून घ्या. केस निट कोरडे करा नाहीतर उद्या सर्दी होईल तुम्हाला. युवराजांचा हा अनोळखी आपलेपणा मला सहन होईना. कुठेतरी अंधाऱ्या मनांत एक प्रकश किरण दिसला. बंधुनाहीत पण युवराज आहेत. युवराजांच्या नाते बंधाला बंधूंच्या श्वासाचा गंध येत होता. युवराज निघतो मी आता. माझा हात घट्ट धरून मला खाली बसवून युवराजांनी विचरला कुठे निघता..? घरी... , हताशपणे युवराज म्हणाले, मग हे घर तुमच नाही का.? शरीराने बंधू इथे नसले तरी आत्म्याने ते इथेच आहेत. त्यांना सोडून आताच जाणार का तुम्ही? अविश्वास आणि असुयेचे सगळे ढग पांगले होते. मनाचे आकाश निरभ्र झाले होते. युवराजांचा हात हातात घेऊन मी म्हटलं नाही युवराज आजतरी मी कुठेच जाणार नाही. बंधूंनाही आणि तुम्हालाही सोडून.
सर्व मंडळी पांगली होती ,. नोकराने बंगाल्यावरचे दिवे मालवले. माधवराव जी झोपायला त्यांच्या खोलीत जायला निघाले. विमनस्कपणे बसलेल्या युवराजांना ते म्हणाले आता आपणही विश्राम करावा. पंचम गेस्टरूम मध्ये आपला बिछाना घातलाय, ." माधवराव पंचम आज आमच्या शेजारीच झोपतील त्यांची हरकत नसेल तर. युवराजांच्या मागोमाग मी बंधूंच्या खोलीत गेलो. त्यांच्या प्रशस्थ बिछान्यावर एका कोपऱ्या त मी अंग चोरून झोपलो. माधवरावजीने खोलीचा दरवाजा ओढला. बेडल्याम्पं लाऊन मोठा दिवा मालवला. बंद दरवाजाच्या फटीतून जाताजाता त्यांचे डोळे पुसणे माझ्या नजरेतून सुटले नाही. आम्ही दोघेही छताकडे डोळे लाऊन बघत होतो. दोघांच्याही मनात पाझरणारी एकच व्यथा होती बंधू नसल्याची, ती निःशब्द व्यथा. अंधाराला कातरत युवराजांचे शब्द कानावर पडले,"पंचम झोप येत नाही का?" नकळत मी हुंकारलो, नाही. कशी येईल. एवढेच म्हणून युवराज माझ्या जवळ; सरकले. त्यांचा हात माझ्या डोक्यावर आला आणि मला थोपटू लागला. थोपटता थोपटता बंधुंच आवडत स्तोत्र ते पुटपुटत होते. त्या थोपटण्य़ाने मी कधी झोपी गेलो ते कळले सुध्दा नाही. सकाळी जाग आली तेव्हा युवराज शेजारी नव्हते. खोलीतल्या कोपऱ्यातल्या स्वामींच्या फोटो समोर ध्यान लाऊन बसले होते. बिछान्यातून उठून बघितलं. बंधूंची आवडती शाल त्यांनी माझ्या अंगावर पांघरली होती आणि माझे पाय पूर्ण झाकायला हि ते विसरले नव्हते. सवयीनुसार मी खोलीच्या खिडकीतून बाहेर बघितलं. अंगणात बंधूने लावलेल्या पारिजाताच्या समोर फुलांचा सुगंधी सडा पडलेला होता. जणू बंधूच प्रसन्नपणे हसत होते
शशांक रांगणेकर
क्रमशः


No comments:
Post a Comment